मुक्ताईनगर तालुका व परिसरातील प्राचिन महादेव मंदिरे

संदीप जोगी / मुक्ताईनगर…..

आदिशक्ति मुक्ताईच्या पद स्पर्शाने पावन झालेला मुक्ताईनगर

तालुका व परिसर हा तापी पूर्णा नद्यांच्या खोऱ्यांनी समृद्ध झालेला असून सातपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य परिसराने नटला आहे

आदिशक्ति मुक्ताई, चांगदेव मंदिर हरताळा येथील श्रावण बाळ मंदिर, मालेगाव कालिंका माता मंदिर, चारठाना येथील भवानी माता मंदिर, शिरसाळा येथील जागृत हनुमान मंदिर , उजनी दर्गा हे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आध्यात्मिक ठिकाण मुक्ताईनगर तालुका व परिसरात आहेत.

याव्यतीरिक्त मुक्ताईनगर तालुका व आजूबाजूच्या परिसरात प्राचिन महादेवांची मंदिरे आहेत.

सध्या श्रावण महिना सूरू असून आज आपण जाणुन घेऊया मुक्ताईनगर परीसरात असलेल्या प्राचिन महादेव मंदिरांविषयी

वडगाव ता मुक्ताईनगर येथील प्राचिन महादेव मंदिर—-

मुक्ताईनगर येथून कू-हा रस्त्यावर 16 कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर वडगाव येथे पुरातन महादेव मंदिर आहे.

मंदिराचे अंतर व बाह्य कोरीव शिल्प यावरून हे मंदिर किती प्राचिन आणि पौराणिक आहे हे लक्षात येते

मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील महादेव मंदिर हे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात पुरातन असे हेमाडपंथी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचे अंतर आणि बाह्य भागातील कोरीव शिल्प या मंदिराच्या पौराणिकतेचे दाखले देतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची गर्दी आणि अन्नदान यामुळे भाविकांची मांदियाळी असते.मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर हे पुरातन महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात आजही कोरीव शिल्प केलेले खांब पडून आहेत. मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे मंदिर परिसरात एक पुरातन पाय विहिर असल्याचे असल्याचे सांगण्यात येते आणि त्यातून मध्य प्रदेश असीरगड आणि चारठाणा भवानी मंदिराला जाणारा भुयारी मार्ग असल्याचे आख्यायिका आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात नेहमी अंधार असतो. या ठिकाणी विजेचा दिवा टिकत नसल्याचे सांगितले जाते.श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची मांदियाळी असते. अन्नदान करणाऱ्यांचे येथे नंबर लागतात. मंदिरावर महेंद्र भरती महाराज यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य असून, ते याठिकाणी देखरेख करतात.

 

*मेहुण येथील सोमेश्वर महादेव मंदिर—–

 

मुक्ताईनगर तालुक्यात तापी नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात आदिशक्ति मुक्ताईचे मंदिर आहे या मंदिर परीसरात प्राचिन सोमेश्वर महादेवाचे हेमाडपंथी शैलीचे प्राचिन मंदिर आहे

कोरीव दगडात या मंदिराचे बांधकाम आहे

तापी नदी काठावर हे मंदिर असून अत्यंत मनमोहक निसर्गरम्य हा परीसर आहे

आदिशक्ती मुक्ताई मंदिर परिसरात वर्षभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर आहे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात हजारो भाविक महादेवाचे आणि आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घेतात

 

 

 

*सिद्धेश्वर महादेव मंदिर——

*तापी पूर्णा संगम जुने मेळसांगवे*

हतनूर धरणाच्या निर्मिती मुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांचे पुनर्वसन झाले आहे

 

मेळसांगवे गावाचे पुनर्वसन झाले असले तरी तापी पुर्णा संगमावर एका बेटाच्या स्वरूपात जुने मेळसांगवे गाव आपले अस्तित्व टिकवून आहे चांगदेव येथे तापी पुर्णा नदीच्या संगमावर विशाल जलसागर असून या जलसागरातून चांगदेव येथुन नौकेद्वारे जुने मेळसांगवे बेटावर जाता येते तसेच नविन पुनर्वसित मेळसांगवे गावातून सुद्धा या बेटावर म्हणजे जुने मेळसांगवे गावात जाता येते येथे सिद्धेश्वर महादेवाचे प्राचिन मंदिर आहे

 

मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला असुन मुळ शिवलिंग कायम आहेयेथील शिवलिंग हे मनमोहक आहे

 

एखाद्या बेटा सारखा निसर्गरम्य परिसर असून येथुन तापी पूर्णेचा विस्तिर्ण जलाशय बघायला मिळतो

 

 

*नागेश्वर महादेव मंदिर जूनेगाव मुक्ताईनगर—-

 

 

जुनेगाव मुक्ताईनगर येथे नागेश्वर महादेवाचे मंदीर असून येथे स्थापित शिवलिंग हे मनमोहक आहे

 

मंदिराचा बाह्य आकार सुद्धा शिवलिंगा सारखा असून तो भविकांचे लक्ष वेधुन घेतो

 

मुक्ताईनगर वासियांचे हे श्रद्धास्थान असून वर्षभर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते श्रावण महिन्यात महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजीत केला जातो

 

 

 

*फत्तेपूर महादेव मंदिर*

*पूर्णा नदी पुलाजवळ मुक्ताईनगर—–

 

मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रस्त्यावर पूर्णा नदीवर असणाऱ्या पुला जवळ मुक्ताईनगर कडून आपल्याला फत्तेपूर महादेव मंदिराची कमान दिसते

या कमानीतून आत गेल्यावर पुढे महादेवाचे मंदिर आहे ते फत्तेपूर महादेव मंदिर म्हणुन ओळखले जाते

मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन नविन मंदिर सुंदर स्वरूपात बांधण्यात आले आहे

श्रावण महिन्यात येथे महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी असते

 

 

*रामझिरा आणि राऊत झिरा,ता- बोदवड—

 

राम झिरा बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो गावाजवळ प्राचिन दोन शिव मंदिर असून एक राम झिरा तर दुसरे राऊत झिरा म्हणुन ओळखले जाते

 

 

रामझिरा येथील शिवलिंग हे पंचमुखी आहे

 

पंचमुखी शिवलिंग हे क्वचित ठिकाणी बघायला मिळते

 

राम झिरा येथे तपस्वी मोहनगिर महाराजांची समाधी आहे

 

येथे वनवासात प्रभु श्रीरामचंद्र यांनी बाण मारून झऱ्याची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे

 

राऊत झिरा

 

राऊत झिरा येथे प्राचिन काळ्या पाषाणातील शिवलिंग स्थापित आहे मंदिराच्या कळसावर नवनाथांच्या प्रतिमा आहेत

येथे प्राचिन गढीचे अवशेष बघायला मिळतात

 

त्यातील एक दगडी वास्तू अजुन उभी असून वास्तूचे दगडी खांब परीसरात विखुरले आहेत यावर सुंदर असे कोरीव काम केलेले येथे हनुमानजीचे मंदिर सुद्धा आहे

मंदिरा जवळच तलाव आह

 

 

*धुपेश्वर महादेव मंदिर—–

 

 

धुपेश्वर महादेव मंदिर हे खान्देश व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पूर्णा व विश्वगंगा या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले एक अति प्राचिन शिवमंदीर आहे

 

हे मलकापूर तालुक्यातील हरसोडा ग्रामपंचायत अंतर्गत येते.

 

खान्देश विदर्भ या भागातील भाविकांची या महादेवावर मोठी श्रद्धा असून भाविक मोठ्या संख्येत या तीर्थक्षेत्राशी जुळले आहेत.

 

धुपेश्वर प्राचीन विदर्भातील दंडकारण्याचा प्रभाग असून प्रभू रामचंद्र वनवासात असतांना पूर्णेच्या तीरावर त्यांनी या शिवलिंगाची स्थापना करून पुजा-अर्चा केली अशी आख्यायिका आहे.

 

धुपेश्वर तिर्थक्षेत्राचे शिवमंदीराचे वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी पुर्णा नदीला चंद्रकोरीचा आकार आहे,आणि बरोबर नदीच्या तीरावर धुपेश्वराचे शिवलिंग आहे,अर्थात महादेवा विषयी असलेली “भालचंद्र” ही उक्ती येथे पूर्ण होते.

 

एक गरीब विठ्ठल नामक व्यक्ती गुरे चारत असतांना त्याला जंगलात एक शिवलिंग आढळले त्याने त्याची आराधना सुरु केली, या विठ्ठलावर शंकराची कृपा झाली त्याला दिव्य शक्ती प्राप्त झाली व तेंव्हापासून हा विठ्ठल विठ्ठल लहरी बाबा म्हणून ओळखल्या जाऊ लागला.

 

श्री विठ्ठल लहरी पूजारी बाबा यांनी आपले पूर्ण आयुष्य धुपेश्वर महादेवाच्या सेवेसाठी खर्ची घातले. बाबांचे अनेक चमत्कार त्या काळी भाविकांना प्रत्यक्ष अनुभवास आले. बाबांमुळे या तीर्थक्षेत्राची महती वाढली. दरम्यान बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील रावसाहेब बाबुराव पाटील यांनी प्रथम या मंदिराचा सन १९३९ साली जीर्णोद्धार केला. रावसाहेब पाटील हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे काका होते.

 

विठ्ठल लहरी बाबाच्या काळात येथे घनदाट अरण्य होते, तसेच हिंस्त्र श्वापदांची व मोठ-मोठे भुजंग यांची ही या ठिकाणी वस्ती होती, अशा कठीण परीस्थितीत ही लहरी बाबानी सर्व संकटाना तोंड देत मंदीराची मनोभावे सेवा-अर्चा केली. .

 

“विठ्ठले” हा लहरी बाबांना अभिप्रेत असलेला महामंत्र आहे.

 

सन १९४६ साली मंदिराचे श्री विठ्ठल लहरी पुजारी बाबांनी मंदिराजवळ जिवंत समाधी घेतली. त्यांच्या पश्चात हभप रामभाऊ पुजारी बाबांनी मंदिराचे सेवाकार्य जोपासले. आद्य पुजारी बाबा त्यांचा वारसा पुढे चालवत गुरूवर्य श्री.रामभाऊ पुजारी बाबा यांनी जन्मभर मंदीराची पुजा-अर्चा केली.

 

श्री प.पु.स्वानंदमूर्ती विठ्ठल लहरी बाबा, श्री.प.पु.सद्गुरू रामभाऊ बाबा यांचे येथे समाधी स्थळ आहे तसेच मंदिरात श्री.प.पु.डॉ.शांताराम जोशी, श्री.प.पु.सद्गुरू रामभाऊ बाबा, श्री प.पु.स्वानंदमूर्ती विठ्ठल लहरी बाबा यांच्या मूर्तीरूपी स्मारके बनविलेले आहे. रामभाऊ पुजारी बाबा नंतर ह.भ.प.पुंजाजी महाराज, यांच्या रूपाने मंदीराला नवीन पुजारी लाभलेले आहेत.

 

धुपेश्वर येथील अन्नछत्र, शिवआरती, अंगारा व विशेषतः शिवपुजा खूप प्रसिध्द आहे.

 

संस्थानाची गौशाला असून गोमातांचे संगोपन केले जाते.

 

या मंदिरालगत पुर्णामाईच्या तीरावर अनेक मंगलकार्ये केली जातात. येथून पूर्णा नदीचे अथांग पात्र दिसून येते. नदीकाठी बगीचा आहे. येथून मोठा पूल असून पुलाच्या दुसऱ्या बाजूला मुक्ताईनगर तालुका कुऱ्हा हे गाव आहे.

 

महाशिवरात्री, श्रावण सोमवार, श्री विठ्ठल लहरी बाबा व रामभाऊ पुजारी बाबा यांच्या पुण्यतीथीला धुपेश्वर येथे भाविकांची प्रचंड मांदीयाळी जमते. श्रावण सोमवारी शंकराचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

 

धुपेश्वर जाण्याचा रस्ता

 

मलकापूर येथून धुपेश्वर १२ की.मी. अंतरावर आहे.

 

मलकापूर – धरणगाव – झोडगा – धुपेश्वर

 

मुक्ताईनगर येथून धुपेश्वर अंदाजे ३० की.मी. अंतरावर आहे.

 

मुक्ताईनगर – पूर्णाड फाटा – डोलरखेड – इच्छापूर निमखेडी – कुऱ्हा काकोडा – धुपेश्वर

 

 

*कोटेश्वर महादेव मंदिर——–

 

मलकापूर तालुक्यातील नरवेल गावाबाहेर नळगंगा नदीच्या जवळ कोटेश्वर महादेवाचे मंदिर आहे .

 

धुपेश्वर महादेव मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे प्राचिन महादेव मंदिर असून

 

चौदा वर्ष वनवासात असताना

 

प्रभु श्रीरामचंद्रानी या शिवलिंगाची स्थापना केली

 

प्रभु श्रीरामचंद्र यांनी चौदा वर्षाच्या वनवासात

 

एक कोटी शिवलिंगाची स्थापना केली त्यातील हे शिवलिंग म्हणुन याला कोटेश्वर महादेव म्हणुन ओळखले जाते अशी आख्यायिका आहे

 

येथे प्रभु श्रीरामांच्या पादुकांचे सुद्धा दर्शन होते

 

पूर्णा नळगंगा नदीच्या खोऱ्याचा हा परीसर असून सत्य युगात येथे घनदाट जंगल होते

 

त्यावेळी येथे आयुर्वेदात प्रसिद्ध असलेले, ब्रम्हाजींचे मानस पुत्र चवन यांचा आश्रम होता असे म्हटले जाते

 

मंदिर परिसरात वेगवेगळे वृक्ष असून परिसर निसर्गरम्य आहे.

 

 

सूचना -मंदिरांविषयी माहिती हि ऐकिव , आख्यायिका स्वरूपातील आहे याची नोंद घ्यावी