आंदोलन: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंत्यांना निवेदन
शिंदखेडा 'महावितरण'वर भाजपचा आक्रोश
शिंदखेडा(प्रतिनिधी): तालुक्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतीसाठी कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने सोमवारी महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालयावर भाजपने मोर्चा काढीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंता नीरज वैरागळे यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील भगवा चौकातील आमदार जयकुमार रावल यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सोमवारी सकाळी दहाला मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त करीत आपल्या भावना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. निवेदनाचा आशय असा शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने कमीत कमी बारा तास वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांना दुबार लागवडीची विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना जळालेल्या टान्स्फॉर्मर तत्काळ द्यावा, शिंदखेडा येथे नवीन १३२ केव्ही मंजूर व्हावे, युती शासनाच्या काळात जिल्हा नियोजन समितीकडून शेतकन्यांसाठी प्रत्येक विभागात ५० टान्स्फॉर्मर राखीव दिले होते, ते कुठे गेले याबाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी महावितरणं जुन्या प्रणालीवर विद्युत पुरवठा करीत आहे. नवीन विद्युत प्रणाली सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. शेतकऱ्यांनी खरीप पिकाची लागवड केली असून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिकांना पाणी देण्यासाठी सिंचनाचा उपयोग करावा लागत आहे. यात दोन तासच विद्युत पुरवठा मिळत आहे. यामुळे पीक वाया जात आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन—-
दिवसातून दोनच तास वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसांत बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला आहे. येत्या तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन अधीक्षक अभियंता नीरज वैरागळे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. तसेच, उपविभागातील अभियंता सुरळीत वीजपुरवठा देण्यास अपयशी ठरले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.