देशभरात भाजपविरोधात नाराजीचे वातावरण आहे!

0

सातारा । भारतीय जनता पक्षाबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील 2019च्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलण्यास सध्या अनुकूल वातावरण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र, नक्की किती जागा मिळतील आणि सरकार बनेल की नाही, याबाबत आत्ताच भाष्य करता येणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अन्य पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पवार यांची दिल्लीत नुकतीच भेट झाली होती. त्याबाबत त्यांना विचारले असता पवार म्हणाले, राज्यासह केंद्रात काँग्रेससोबत एकत्र काम करण्याची इच्छा आहे. काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी अनेक राज्यांत काँग्रेसचे अस्तित्व कायम आहे, ते आपण मान्य केले पाहिजे, म्हणून समविचारी पक्षांनी त्यांच्या सोबत राहावे, असे पवार म्हणाले.

मराठीच्या अभिजात दर्जाबाबत सरकार गंभीर नाही
राज्यात कालच सर्वत्र मराठीचा वापर करण्याबाबतचा सरकारने परिपत्रक काढले. मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सरकार हालचाली करत नसल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत आणि धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत सरकार गंभीर नाही, त्यांची निवडणुकीतील आश्‍वासने हवेतच विरली आहेत.

आयोगाने लोकांच्या मनातला संशय दूर करावा
निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत बोलताना पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीत लोकांच्या मनातील संशय दूर करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. हे काम त्यांनी चोखपणे केले तरच ते लोकशाहीच्या हिताचे असेल. जनतेला आश्‍वासक आणि निर्भय परिस्थिती असल्याचे पटवून देणे हे आयोगाचे काम असल्याचे ते म्हणाले.