अनिल अंबानीच्या टेलिकॉम कंपनीला ११२० कोटींची करमाफी; फ्रेंच वृत्तपत्राचा खळबळजनक दावा

0

नवी दिल्ली: राफेल करारामुळे मोदी सरकार व उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर सातत्याने विरोधक टीका करत आहे. दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील कागदपत्राच्या आधारावर राफेलबाबत दुबार सुनावणी करण्यास संमती दर्शविली आहे. दरम्यान आता राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला १४३.७ मिलियन युरो म्हणजेच सुमारे ११२० कोटींची करमाफी दिली असा खळबळजनक दावा फ्रेंच वृत्तपत्र ‘ले माँड’ने केला आहे. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

२०१५ या वर्षत फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यांच्या कालावधीत राफेल या लढाऊ विमान खरेदीसाठी करार सुरु होता. नेमक्या याच कालावधीत अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला ११२० कोटींची करमाफी देण्यात आल्याचा दावा ले माँड या वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळात विरोधकांच्या हाती आणखी एक कोलीत आलं आहे असेच म्हणता येईल

राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली असा आरोप आता ले माँडने दिलेल्या करमाफीच्या आरोपानंतर काँग्रेसने केला आहे. राफेल करार झाल्यापासूनच राहुल गांधींसह सगळ्याच प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राफेल करारात घोटाळा झाला आहे असा आरोप केला. तसेच देशातील जनतेचे पैसे मोदींनी लुटून अनिल अंबानींना दिले असेही राहुल गांधींनी वारंवार म्हटले आहे. आता अनिल अंबानी यांच्या फ्रान्स येथील कंपनीला ११२० कोटींची करमाफी दिल्याचे वृत्त फ्रान्स मीडियाने दिले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे.