अनिल अंबानी यांच्या पुत्राला पहिल्याच व्यवहारात १७०० कोटींचा नफा

0

मुंबई- अनिल अंबानींचे पुत्र अनमोल अंबानी यांनी केलेल्या पहिल्याच व्यवहारात रिलायन्स कॅपिटल समूहाला मूळ गुंतवणुकीच्या २५ पट जास्त नफा मिळाला आहे. अनमोल २०१६ मध्ये संचालक म्हणून रिलायन्स कॅपिटलमध्ये रुजू झाला. अनमोल अंबानींनी रिलायन्स समूहाचा कोडमास्टर्स या कंपनीतला ६० टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांना विकला आहे. कोडमास्टर्स ही इंग्लंडमधली गेम डेवलप करणारी कंपनी आहे. या कंपनीचे ९० टक्के शेअर्स रिलायन्सने २००९ मध्ये १०० कोटी रुपयांना विकत घेतले होते. नुकत्याच झालेल्या व्यवहारामध्ये अनमोलने या कंपनीतील ६० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्यानं हे शेअर्स १७०० कोटी रुपयांना विकले.

२५ पट नफा
दहा वर्षापूर्वी ज्या ६० टक्के शेअर्ससाठी रिलायन्सने ६६.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्याचे आता १७०० कोटी रुपये म्हणजे २५ पट झाले आहेत. रिलायन्सकडे अजून कोडमास्टर्सचे ३० टक्के शेअर्स आहेत ज्याचं मूल्य ८५० कोटी रुपये आहे. फॉर्म्युला वन सारखे रेसिंग गेम डेवलप करण्यात ही कंपनी जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. कोडमास्टर्सचे सीईओ फ्रँक सॅगनीर यांच्याकडे १० टक्के शेअर्स आहेत. या कंपनीची पाच ठिकाणी कार्यालये आहेत, तीन इंग्लंडमध्ये, एक कौलालंपूरमध्ये व एक पुण्याला. इंग्लंड व युरोपमधल्या एकूण ३० संस्थात्मक गुंतवणूकदारांना ६० टक्के शेअर्स विकण्यात आले आहेत.

लवकरच कोडमास्टर्सची नोंदणी लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोडमास्टर्सचे उत्पन्न ३१ दशलक्ष पौंडांवरून दुपटीनं वाढून ६४ दशलक्ष डॉलर्स झाले आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाची हॉलीवूडमधल्या ड्रीमवर्क्स या फिल्म स्टुडिओमध्येही गुंकवणूक आहे.