राळेगणसिद्धी- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठेवलेल्या ९० टक्के मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण झाल्या असून अण्णांनाही याची माहिती देण्यात आली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज अण्णा हजारेंच्या नियोजित उपोषणाला राळेगणसिद्धी येथे सुरुवात झाली. या ठिकाणी महाजन यांनी अण्णांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची बाजू मांडली.
अण्णा हजारेंनी सरकारसमोर ठेवलेल्या विविध मागण्यांपैकी लोकपाल-लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी असून यापूर्वी अॅड. राव या विधीतज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची स्थापना झाली होती. मात्र, राव यांचे निधन झाल्याने हे काम थांबले होते. मात्र, नुकतेच २७ सप्टेंबर रोजी ८ सदस्यांची नवीन निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर लोकायुक्तांच्या नियुक्तीला वेग येईल.
त्याचबरोबर शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नांवर अण्णांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यानुसार, कृषी मुल्य आयोगाची स्थापना करण्याबाबतची अण्णांची एक महत्वपूर्ण मागणी होती. या मागणीनुसार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव मिळायला हवा, अशा मागण्या आहेत. या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती, त्यामुळे अण्णांची ही मागणी पूर्ण झाल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.