मुंबई- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून चोरी झालेल्या प्रकरणात घोटाळ्याच्या फाईल सुरक्षित असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी माहिती दिली आहे. फाईल चोरी प्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे यांना निलंबित करण्यात आले असून चोरी करणारे चोरटे हे अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांचा भाऊ आणि त्याचे साथीदार असल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा
कांबळे म्हणाले की, कार्यालयात चोरी झाली असली, तरी रमेश कदम यांच्या खटल्यावर परिणाम होणार नाही. कारण रमेश कदम यांच्यावर सीआडीने कारवाई करताना, महत्वाची कागदपत्रे आधीच ताब्यात घेतली आहेत, असे कांबळे यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही 4 मजली इमारत आहे. या इमारतीच्या कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स आहेत. मात्र त्यापैकी काही फाईल्स चोरुट्यांनी पळवल्या असल्याचा आरोप आहे.
महामंडळाच्या कार्यालयाचे सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला आहे.