नवी दिल्ली-#Me Too मोहिमेने बॉलिवूड थैमान घातले आहे. या मोहिमेअंतर्गत संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होत आहे. चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप अनु मलिक यांच्यावर केले आहेत. यामुळे’इंडियन आयडल 10’च्या परिक्षक पद धोक्यात आले आहे. या पदावरून हटविण्यासाठी दबाव येत असून सोनी टीव्हीने त्यांना या पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले जात आहे. आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अनु या शोमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे पुढील काही एपिसोडमध्ये अनु मलिक नसणार, असे सांगितले जात आहे.
सर्वप्रथम गायिका श्वेता पंडित हिने अनु मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर गायिका सोना मोहपात्रा हिनेही अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला. पाठोपाठ अन्य दोन महिलांनीही अनु मलिकविरोधात आवाज उठवला. मात्र, दोघींनीही नावे जाहीर केलेली नाहीत.
‘अनू मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर ते माझ्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली, असा एका महिलेचा आरोप आहे.अनु मलिक यांच्यावर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक राहिली आहे.