नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आज मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी अमेरिकी बनावटीचे आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. वायुसेना प्रमुख बी.एस.धनोआ यांच्या उपस्थितीत आज पठाणकोटमध्ये या नव्या हेलिकॉप्टरचा लोकार्पण सोहळा पार पडला. अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याच बरोबर ‘अपाचे’हेलिकॉप्टरची वापर करणारा भारत हा १५ वा देश ठरला आहे.
इराक युद्ध आणि अफगानिस्तानात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर केला होता. भारतीय वायुसेनेने सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकेच्या बोइंग लिमिटेडसोबत २२ अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार झाला होता. त्यानुसार भारताला ४ हेलिकॉप्टर मिळाले. त्यानंतर आता आठ मिळाले आहे.पुढील वर्षापर्यंत सर्वचे सर्व २२ हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील.