मुंबई-अरबाझ खानच्या बेटिंगच्या सवयीमुळेच त्याची पत्नी मलायकाशी बिनसले व त्याची परिणिती अखेर घटस्फोटात झाली असा पैलू समोर येत आहे. क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली अरबाझने दिल्याचे वृत्त असून तो पोलिसांना सहकार्य करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएलमधला बेटिंग घोटाळा गेल्या आठवड्यात उघडकीस आला असून आपणही सट्टा लावल्याचे कबूल केल्यानंतर अरबाझ एकदम चर्चेचा विषय झाला.
सट्टा लावल्याची कबुली
गेली सहा ते सात वर्षे आयपीएलमधल्या सामन्यांवर अरबाझ सट्टा लावत होता अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अरबाझची शनिवारी चौकशी केली असून यंदाच्या सीझनमध्ये अरबाझने आयपीएलमध्ये सट्टा लावला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. सोनू जालान या कुख्यात बुकिला पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक जणांची नावे समोर आली त्यात अरबाझही होता. विशेष म्हणजे अरबाझ तब्बल २.८० कोटी रुपये सट्ट्यामध्ये जालानकडे हारला असून तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यावरून जालानने त्याला धमकीही दिली होती.
जालानला ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या पोलिस कोठडीतील चौकशीमध्ये अरबाझ खानचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांना आपण लागेल ते सर्व सहकार्य करू असे अरबाझने सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या सांगण्यानुसार अरबाझ खानला सट्टा खेळण्याचे व्यसन गेल्या पाच सहा वर्षांपासून लागले होते. त्यावरून त्याचे मलायकाशी खटकेही उडत होते. सट्टा खेळण्यापासून अरबाझला परावृत्त करण्याचा प्रयत्न मलायकाने केला, मात्र त्यात तिला यश आले नाही. आधीच बिघडलेले संबंध त्यामुळे आणखी बिघडले आणि दोघांनी २०१६ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.