फैजपूर प्रतिनिधी l
येथील स्टेट बँकेतील कर्मचारी खातेदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता त्याच्या खात्यातून परस्पर पैसे कपात करीत असल्याने अशा मनमानी कर्मचाऱ्याची वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. येथील बँकेतील राजकुमार नामक कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी करून नेहमीच हुज्जत घालत असतो. विशेषतः खेड्यापाड्यातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग व ग्राहकांना साध्या सरळ शब्दात समजावून न सांगता मेटाकुटीला आणीत असल्याने या कर्मचाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. आज एका बँक ग्राहकाच्या खात्याचे (खाते क्र. ६२२४५४६८०४८) वार्षिक अकाउंट स्टेटमेंट ४८३ नोदींचे, सात पानाचे स्टेटमेंट काढले असता त्याच्या खात्यातून तब्बल २३६ रुपये परस्पर कपात करण्यात आली. मात्र याबाबत संबंधित खातेधारकाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नाही. पंधरा मिनिटानंतर पैसे कपात झाल्याचा संदेश संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर आला. याबाबत स्थानिक पत्रकाराने बँकेत जाऊन व्यवस्थापकाची भेट घेऊन ग्राहकाला बँक स्टेटमेंट देण्याबाबतचे नियम काय आहे ? कॉम्पुटर प्रिंटच्या एका पानासाठी तसेच किती नोंदीसाठी कसे पैसे आकारण्यात येतात ? त्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचा नियम दाखवा ? अशी विचारणा केली असता व्यवस्थापकांनी सदर कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवून स्वतः बँकेतून काढता पाय घेतला. कर्मचाऱ्यांने याबाबत नियमही दाखवला नाही आणि समाधानकारक उत्तरही दिले नाही. उलट पक्षी आपण एक एप्लीकेशन द्या म्हणजे आपल्या खात्यात पुन्हा ते पैसे वर्ग होतील असे नियमबाह्य उत्तर दिले. सध्या इन्कम टॅक्स भरण्याची गर्दी असल्याने अनेक खातेधारकाला बँक स्टेटमेंटची गरज असते मात्र संबंधित कर्मचारी त्यांची दिवसाढवळ्या फसवणूक करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. येथील ग्राहकांना त्यांचे पासबुक प्रिंट करून देत नसल्याने नाईलाजास्तव बँक स्टेटमेंट घ्यावी लागत आहे. परंतु सदर कर्मचारी त्याचा गैरफायदा घेऊन खातेदाराच्या खात्यातून परस्पर रकमा कापून घेत ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन नियमबाह्य व हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या कर्मचारी राजकुमार याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.