जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर-जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर दोन जवान या चकमकीत जखमी झाला आहे. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील कुंदलन गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याच्या पथकाला मिळाली. मंगळवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. दहशतवादी एका घरात लपले असून सैन्याच्या जवानांनी चारही बाजूंनी घेरले आहे. या चकमकीत आत्तापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून सैन्याचे दोन जवानही यात जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. घरात आणखी तीन दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज आहे. सैन्याची मोहीम सुरु असताना या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरले. सुरक्षा दलांना जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला असून यात १५ नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांमध्ये एक तरुण असून त्याच्या पायाला गोळी लागली असून त्याची प्रकृती गंभीर आहे.