श्रीनगर-जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील मुनवार्ड परिसरात आज सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रांचा साठा आढळून आला. या परिसरात आता सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मुनवार्ड येथे दहशतवादी आल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षादलांनी मुनवार्डला चारी बाजूंनी घेरले होते. सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु, त्यांनी गोळीबार केला. प्रत्युरात झालेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे मंगळवारी लष्कराचे वाहन आयइडीने उडवून देण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबारही केला. भारतीय लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. परंतु, दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्याप्रमाणात दहशतवादी असल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी सांगितले. हे सर्वजण घुसखोरीच्या तयारी असल्याचेही ते म्हणाले.