नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लागवणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली असून काल रात्री चौकशी केल्यानंर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लागवणाऱ्या युवकाचे नाव सुरेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर सुरेशने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी सुरेशवर भारतीय दंड विधान कलम 323 (मारहाण करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघामध्ये ‘रोड शो’ करीत असताना सुरेशने जीपवर चढून काल थप्पड लगावली होती. अरविंद केजरीवाल यांच्यावर असा हल्ला होण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या पाच वर्षात त्यांच्यावर नऊवेळा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पाचवेळा हल्ला झाला आहे. एप्रिल 2016 मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेतच त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. वेदप्रकाश शर्मा असे या व्यक्तीचे नाव होते.
तर फेब्रुवारी 2016 मध्ये लुधियानामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉडने हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती. जानेवारी 2016 मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. तसेच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.