नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३५ अ बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती. मात्र यावेळी देखील ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढच्यावर्षी जानेवारीपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठाने सुनावणी स्थगित करण्याचा निर्णय दिला. याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी यांनी या अनुच्छेदच्या वैधानिकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होहते. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १९ जानेवारी २०१९ ला होईल.
जम्मू-काश्मीर सरकारने आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारकडून महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सर्व सुरक्षा संस्था या राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या तयारीमध्ये असल्याचे न्यायालयाला सांगितले.
कलम ३५ अ च्या मुद्यावरून जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. फुटीरतावाद्यांनी गुरूवारी काश्मीर खोरे बंदचे आवाहन केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या प्रमुख पक्षांचाही सुनावणीला विरोध होता.