मिळालेल्या पुरस्कारामुळे कलाकार रिटायर होत नाही-संभाजी पाटील-निलंगेकर

0

भोसरी :- कलाकारांना मिळणारा पुरस्कार हा त्यांना खूपच गौरवास्पद असतो. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे कलाकार रिटायर होत नाही, तर पुरस्कारामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते, असे मत कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी व्यक्त केले.श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रंगकर्मी समिधांचा गौरव व पुरस्कार – 2018 कार्यक्रमांतर्गत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कारांने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील कलाकारांचा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते.

नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांना सन्मानित करण्यात आले. तसेच नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्काराने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील कलाकार शेखर फडके, अशोक शिंदे, भाऊसाहेब भोईर, योगेश सोमण, अरुण नलावडे, भाऊसाहेब शिंदे, नायिका मैथिली जामकर, स्मिता पाटील आदींना गौरविण्यात आले. कवड्याची माळ, स्मृतिचिन्ह, भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार महेश लांडगे, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व आमदार संजय केळकर, सभागृह नेते एकनाथ पवार, लायन ओमप्रकाश पेठे, विक्रम गोजमगुंडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद पिलाने, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक अमित बच्छाव, नगरसेविका प्रियांका बारसे, लातूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे आदींसह गोजमगुंडे कुटुंबिय उपस्थित होते.

मराठवाड्याचे सुपुत्राला पुरस्कार देणे ही अभिमानाची बाब
आजपर्यंत मराठवाड्यातील एकाही कलाकाराच्या नावे पुरस्कार दिला जात नाही. मात्र, मराठवाड्याचे सुपुत्र नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने सांस्कृतिक नगरीत पुरस्कार देणे ही सर्व मराठवाडा वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. राजाश्रयामुळे कलाकारांना उंची प्राप्त होते, या मताशी मी सहमत नाही. तर कलाकारांमुळे आम्ही मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहोत. पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकार रिटायर होत नसतो. पुरस्कारामुळे कलाकारांवरील जबाबदारी अधिक वाढत असते, संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले.