कबचौ उमविकडून पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास अंकेक्षणात ‘अ’ दर्जा प्राप्त
शहादा l कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तीन वर्षांचे (अॅकॅडमिक ऑडिट) शैक्षणिक अंकेक्षण झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यांत शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सजन इसन पाटील कला, गिरधर बारकू पटेल विज्ञान व शहादा तालुका खरेदी विक्री संघ वाणिज्य महाविद्यालयास या जाहिर केलेल्या महाविद्यालयांच्या मानांकनामध्ये ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे शैक्षणिक अंकेक्षणात महाविद्यालयास सलग पाचव्यांदा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.
विद्यापीठाच्या वतीने मिळणाऱ्या या मानांकनाकरिता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांमधुन सक्षम नागरिक घडविण्याचे उपक्रम, विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या, विविध परिक्षांचे निकाल, महाविद्यालय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, राबवित असलेल्या विद्यार्थी हिताच्या योजना, महाविद्यालयात उपलब्ध सोयी-सुविधा, महाविद्यालयातील संशोधन उपक्रम, प्राध्यापकांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात नोंदविलेला सहभाग व सादर केलेले शोधनिबंध, अद्ययावत ग्रंथालय सुविधा, सामाजिक उपक्रम, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी उपलब्ध सुविधा, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान इत्यादी माहिती मागविण्यात आली होती. कुलगुरुंनी गठीत केलेल्या समितीने विद्यापीठाला प्राप्त झालेले अर्ज व त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची खातरजमा करून महाविद्यालयास ‘अ’ दर्जा बहाल केला आहे. अकॅडमिक ऑडिट मधुन पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यात सातत्य राखल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील व संस्थेच्या सर्व पदाधिका-यांनी अभिनंदन व समाधान व्यक्त केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा राखून महाविद्यालयास सन्मानजनक ग्रेड मिळवण्यासाठी सहभाग दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
“विद्यापीठातर्फे शैक्षणिक अंकेक्षणात पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त होणे ही अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सोयी – सुविधा मिळाव्यात अथवा महाविद्यालयाची गुणात्मक कामगिरी उत्तम रहावी यासाठी संस्थेची भूमिका नेहमीच आग्रही असते. याचा परिणाम निश्चितपणे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीवर होत असतो.”
बापूसाहेब दीपकभाई पाटील
अध्यक्ष, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा.
————
“कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक अंकेक्षणातून महाविद्यालयाला सलग पाचव्यांदा ‘अ’ दर्जा मिळवून महाविद्यालयाने गुणवत्ता टिकवण्यात सातत्य राखले आहे. महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या सामूहिक व प्रामाणिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले आहे. ”
प्रा. मकरंद पाटील.
समन्वयक,
पूज्य सानेगुरुजी विचार प्रसारक मंडळ, शहादा
————-
” महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा जोपासण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाकडून मिळणारे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची समाधानकारक कामगिरी, महाविद्यालयात विविध उपक्रम राबवितांना असणारी सांघिक भावना यामुळे महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.”
प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील.