पाच न्यायमूर्तींना कोरोनाची बाधा झालेली असल्याने पुढील काही काळ न्यायालयाचे कामकाज
धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी नाही
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीची तारीख २४ एप्रिल ही होती. मात्र, न्यायालयाच्या सोमवारच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा उल्लेख नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. धनुष्यबाण चिन्हाबरोबरच राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सत्ता संघर्षावरील मॅरेथॉन सुनावणी पूर्ण झालेली न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे.
दरम्यान पाच न्यायमूर्तींना कोरोनाची बाधा झालेली असल्याने पुढील काही काळ न्यायालयाचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समलैंगिक संबंधावरील प्रकरणाची सोमवारपासून सलग सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी अलीकडेच घेतला होता. तथापि या प्रकरणाच्या खंडपीठात असलेल्या एका न्यायमूर्तीला कोरोना झाल्याने हे प्रकरणही लांबणीवर पडले आहे. ज्या अन्य चार न्यायमूर्तींना कोरोना झाला आहे, त्यात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे.