औष्णिक वीज केंद्राची राख, झाकते कोणाची झाक ?

प्रशासनाची मनमानी, मक्तेदाराच्या अडचणी

भुसावळ – येथील दीपनगर वीज निर्मिती केंद्रातून दिवसभरात चार हजार पेक्षा जास्त मेट्रीक टन राख प्रकल्पाच्या बाहेर पडते. ही राख ८० टक्के मोठ्या कंपन्याना व उर्वरित टक्के लघु उद्योजकांना दिली जात होती. मात्र गेल्या महिन्यात एका विख्यात कंपनीला कुठलीही निविदा न काढता मोठी ऑर्डर दिल्याने इतरांवर अन्याय होत असून विना निविदा काम होत असल्याने वीज निर्मिती कंपनीचे आर्थिक नुकसान होत आहे. हा छुपा व्यवहार तर नाही ना.? वीज केंद्राची राख, झाकते कोणाची झाक.? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे.

 

चालू वर्षाच्या एप्रिलपासून एका सिमेंट कंपनीला एका दिवसाला ३०० टन राख उचलण्याची ऑर्डर दिली असल्याचे समजते. या कामाची ऑन लाईन निविदा झाली नसल्याचेही समजते. सदर मक्तेदार ३०० ते ३१० रू. प्रती टन भावाने राखेची किंमत अदा करत असल्याचे समजते. याचीच जर निविदा काढली असती तर हा भाव अंदाजे ४२२ रुपये प्रती टन किंवा अधिक मिळाला असता. परंतु तसे झालेले दिसत नाही. या व्यवहारात प्रकाशगड (मुंबई) येथील कार्यालयाची मोठी भुमिका असल्याचे समजते. एकुणच मोठ्या ठेकेदाराचे ‘हित’ जोपासण्याच्या नितीमुळे स्थानिक मक्तेदार व मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या छुप्या व्यवहाराचा उद्रेक होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण? अशी विचारणा आता सामान्य नागरिकांकडून होत आहे.