आशियाई पॅरा स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी तीन पदके

0

जकार्ता-भारतीय संघाने आशियाई पॅरा स्पर्धा २०१८ मध्ये दमदार सुरूवात करताना पहिल्या दिवशी एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला. सुहास यथीराजने एकेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाच्या बाक्री ओमारचा 21-8, 21-7 असा पराभव केला. मात्र, दुहेरीत कुमार राज व तरुण या जोडीला आणि परतीच्या एकेरीत चिराग बरेथा यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

पॉवरलिफ्टिंग प्रकारात पुरुषांच्या 49 किलो गटात लाओ प्रजासत्ताकच्या लाओपाकडी पीयाने 133 किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले. भारताच्या फर्मानने 128 किलोसह रौप्य आणि परमजीतने 127 किलोसह कांस्यपदक जिंकले.