राज्यमंत्र्यांसह लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष
जळगाव – कविता आणि ओवींच्या माध्यमातुन खान्देशला ओळख देणार्या खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी निधीची चणचण भासू लागल्याने या स्मारकाचे काम गेल्या सहा वर्षापासून रखडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या स्मारकाची उंची कमी करून त्याचे मुळ संकल्पचित्रच बदलविण्यात आले आहे. त्यामुळे सरकारकडून या स्मारकासाठी निधी मिळत नसून मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करणारे मंत्री, आमदार हे देखिल निधी आणण्यात कमी पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांचे अतिशय भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय २०१३ साली घेतला होता. बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळीतील खोप्यासारखी या स्मारकाची रचना करण्यात आलेली होती. त्या स्मारकात सुसज्ज ग्रंथालय, संग्रहालय, छोटंसं टुमदार सभागृह, संशोधन केंद्र, अभ्यासिका, तारांगण, छानसं उद्यान अशा अनेक गोष्टींचा समावेश होता, त्याचा आराखडा मंजूर करून सुरुवातीला पाच कोटी रुपये मंजूर करून आणि त्यातील अडीच कोटी उपलब्ध करून देऊन शासनाने कामाला सुरुवात केली. अतिशय वेगात स्मारकाचे काम सुरू झाले होते. मात्र २०१४ साली राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार आल्यपासून या स्मारकाचे काम आस्तेकदम सुरू आहे. निधीच उपलब्ध होत नसल्याने स्मारकाचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. आज या स्मारकाच्या उभारणीची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे. या प्रकल्पाची किंमत १५ ते १६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले आहे.
सरकारसह मंत्र्यांची उदासिनता
खान्देशकन्या बहिणाबाई स्मारकाचे काम पुर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत होती. मात्र ही मुदत केव्हाच निघून गेली असुन सहा वर्षापासून स्मारकाच्या पुर्ततेसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळत नसल्याने स्मारकाचे काम थांबले आहे. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासकीय स्तरावर देखिल आम्ही निधीसाठी पाठपुरावा केला होता. पण शासनाकडून निधीच मंजूर होत नसल्याने हे काम थांबले असल्याची माहिती आसोदा येथील किशोर चौधरी यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.
निधी नसल्यानेच काम थांबले
खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी मार्च महिन्यापासून एक रूपया देखिल मिळाला नाही. गेल्या सहा वर्षापासून निधीची उपलब्धता होत नसल्याने या स्मारकाचे काम रखडत आहे. निधी मिळाला असता तर अवघ्या एका वर्षात या स्मारकाचे काम पुर्ण करता आले असते अशी माहिती स्मारकाचे काम करणारे वर्धमान भंडारी यांनी दिली.
लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष
सन २०१३ मध्ये आघाडी सरकारच्या काळात या स्मारकाला मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे स्मारकाचे काम सुरू झाले होता. दोन वर्षात स्मारकाचे काम पुर्ण होईल असे वाटले होता. मात्र आताच्या सरकारने या स्मारकासाठी निधीच उपलब्ध करून दिला नाही. तसेच या मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करणारे गुलाबराव पाटील हे मंत्री असुन त्यांचे देखिल दुर्लक्षच असल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना केला. तसेच या स्मारकाचे मुळ संकल्पचित्र बदलविण्यात आले असुन त्याची उंची देखिल कमी करण्यात आली आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे आणि राजकीय इच्छाशक्ती अभावी या स्मारकाचे काम थांबणे हे खान्ेदशच्या दृष्टीने दुर्दैवच असल्याचे गुलाबराव देवकर यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण
कवयित्री बहिणाबाई स्मारकासाठी सरकारकडे ९ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने स्मारकाचे काम थांबले आहे. मात्र पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिली.