अपघातानंतर आसोद्याच्या तरूणाचा मृत्यू

0

जिल्हा रूग्णालयात जमावाचा संताप : डॉक्टरांचा हलगर्जीपणा

जळगाव – येथुन जवळच असलेल्या पाळधी बायपास जवळ झालेल्या झायलोच्या अपघातात आसोदा येथील दुचाकीस्वार दोन जण गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा वेळीच उपचार न मिळाल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. यावेळी आसोदा येथील युवकांनी रूग्णालयात गोंधळ करून प्रशासनाविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला.
पाळधी जवळ टायर फुटून झालेल्या झायलो या गाडीच्या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जखमी झाले होते. हे दोघे तरूण आसोदा येथील रहीवासी असुन वासुदेव दशरथ माळी (वय २८) व चेतन लक्ष्मण पाटील असे दोघांची नावे आहे. हे दोघे दुचाकी क्र. एमएच-१९ बीडब्ल्यु- ६८४५ या दुचाकीवर धानोरा येथे लग्नासाठी गेले होते. धानोर्‍याहून परत येत असतांना टायर फुटल्याने उधळलेली झायलो गाडी ही दुचाकीवर आदळली. यात वासुदेव माळी व चेतन पाटील हे दोघे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. या दोघांच्या शरीरातुन रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

जिल्हा रूग्णालयात तणाव
वासुदेव माळी याच्या मृत्यूला जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर कारणीभूत असल्याचा आरोप करीत आसोदा येथील तरूणांनी डॉक्टर कुरकुरे यांना हाकला असे सांगत प्रशासनावर आरोप केला. याठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे जिल्हा रूग्णालयात तणावाची परीस्थीती निर्माण झाली होती. याप्रसंगी पोलीसांनी मध्यस्थी करीत जमावाला शांत केले.

नातेवाईकांचा आक्रोश आणि आरोपही
वासुदेव दशरथ माळी याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असुन यास सर्वस्वी रूग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. जिल्हा रूग्णालयातील डॉ. कुरकुरे यांना वारंवार फोन लावूनही ते उपचारासाठी आले नाही असा आरोप सुनिल माळी यांनी केला. तसेच शिकाऊ डॉक्टरांकडुन योग्य उपचार न झाल्याने भाऊ वासुदेव माळी याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. वासुदेव माळी यांच्या पश्‍चात तीन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. वासुदेव माळी या तरूणाचा मृत्यू झाल्याने त्याचे नातेवाईक व आसोद्यातील युवकांनी मोठा आक्रोश केला.

रूग्णालयात वासुदेव माळीचा मृत्यू
या अपघातातील दोन्ही तरूणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या जखमांना टाचे मारण्यात आले. मात्र उपचारावेळी वासुदेव दशरथ माळी (वय २८) या तरूणाचा मृत्यू झाला. तर चेतन पाटील याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने ओम क्रिटीकल येथे उपचारासाठी हलविण्यात आले.