जळगाव प्रतिनिधी ।
कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा, यासह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी भडगाव येथे पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे आणि तालुकाध्यक्ष अभिमान हाटकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. कापूस खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत. व्यापारी आला तर कापसाला समाधानकारक भाव देत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना उधारी मागणारे चकरावर चकरा मारत आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकरी हतबल झाला असल्याचे सांगितले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संघटनेच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पोहचविण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनात संघटनेचे भगवान चौधरी, शांताराम आचारी, देविदास पाटील, विलास देशमुख, मनोज परदेशी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.