मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे शंख देण्याच्या बहाण्याने दोघांना डांबले, पावणे आठ लाखाचा ऐवज लांबविला
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील हलखेडा येथे १० ते १२ संशयित आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील दोघांना शंख देण्याचे आमिष दाखवून त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. त्यांच्याकडील रोख रक्कम, ५ महागडे मोबाईल, सोन्याची अंगठी असा ७ लाख ७० हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी २३ जून रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवराज हनुमंतराव बिराजदार (वय ४०, रा. सिध्दीविनायक नगर, नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी २२ जून रोजी संध्याकाळी
४ वाजता शंख विकत घेण्यासाठी बसवराज हे आणखी एकसह कार क्र. (एमएच २६ बीसी ८५४६) ने मुक्ताईनगरात आले होते. त्यांना संशयित आरोपी संतोष अजबराव पाटील, गणेश भाऊ उर्फ हकीम रफिक पवार, मुखत्यार भाई, रंजित पवार यांच्यासह १० ते १२ जणांनी हलखेडा येथे एका खोलीत त्यांना डांबून ठेवले.
त्यांना जबर मारहाण करून त्यांच्या कारमधील असलेले ४ लाख ३८ हजार रुपये रोख, पॅन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासह ५ महागडे मोबाईल व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. पोलिसात तक्रार केल्यास तुमची काढलेली विडिओ शूटिंग व्हायरल करू अशी धमकी दिली. त्यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.