व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा ; तिघांना अटक
जळगाव : शहरातील शिवकॉलनी बसस्टॉपवरील टाटा इंडिकॅशचे एटीएम मशीनची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी मशीनमधील 5 लाख 63 हजार 500 रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री शिवकॉलनी बसस्टॉपवर घडली. मंगळवारी सकाळी प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र पांडूरंग जोंबाडे यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, सीएमएस इन्फो सिस्टीम्स लि.या कंपनीमार्फत जिल्ह्यातील वेगवेगळ्या बॅँकेचे एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. शिव कॉलनी थांब्याजवळील टाटा इंडीकॅश हे एटीएम मशीन लावण्यात आले आहे. या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा कंपनीच्या कॉल सेंटरकडून दिनेश पाटील याला सोमवारी दुपारी तीन वाजता संदेश आला. दिनेश व राहूल दोघंही कंपनीच्याच कामासाठी एरंडोल येथे असल्याने दिनेश याने कंपनीचे कस्टोडीयन मुकेश शिंदे याला सायंकाळी साडे सहा वाजता तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी पाठविले. दिनेश याने कंपनीचा गोपनीय 16 अंकी पासवर्ड शिंदे याला सांगितला. त्यानंतर शिंदे याने हा बिघाड दूर केला.
तीन जण ताब्यात
मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता दिनेश याला पुन्हा कंपनीच्या कॉल सेंटरमधून याच एटीएममध्ये बिघाड झाल्याचा संदेश आला. त्यामुळे एटीएमजवळ जावून पाहिले. पासवर्ड टाकून तपासले असता त्यात 500 रुपये दराच्या 1127 नोटा शिल्लक असल्याचे डिसप्लेवर दिसत होते. पैसे तपासण्यासाठी पुन्हा पासवर्ड टाकून एटीएमचा वॉल्ट उघडला असता या सर्व नोटा व कॅश स्लॉट कॅसेटसह गायब झाल्याचे दिसून आले. ही सर्व हकीकत दिनेश याने कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र पांडूरंग जोंबाडे यांना सांगितली. कस्टोडीयन याच्याकडून हकीकत जाणून घेतल्यानंतर व्यवस्थापक महेंद्र जोंबाडे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी तंत्रज्ञ दिनेश प्रकाश पाटील (लक्ष्मी नगर), राहूल संजय पाटील (रा.खडके बु.ता.एरंडोल ) व मुकेश विलास शिंदे (रा.समता नगर) या तिघांना ताब्यात घेतले आहे.