ऑगस्टा वेस्टलँड: ख्रिश्चन मिशेलनंतर आणखी दोन आरोपींना भारतात आणले !

0

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी आरोपी ख्रिश्चन मिशेलला भारतात आणल्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात ईडीच्या पथकाला यश आले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांचे दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीला आणण्यात आले. दुबईमधील अधिकाऱ्यांनी त्यांना बुधवारी सकाळी आपल्या ताब्यात घेतले होते. तसचे, या दोघांना सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांची अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय चौकशी करत आहे. आज दुपारी २ वाजता या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुबईत राहणाऱ्या राजीव सक्सेनाला अंमलबजावणी संचालनालयाने अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठविले होते. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. तसेच, राजीव सक्सेना याची पत्नी शिवानी सक्सेना हिला २०१७ मध्ये चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती. सध्या तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.