औरंगाबाद – शुक्रवारी मोतीकारंजा भागामध्ये रात्री दोन गटांमध्ये मोठा वाद झाल्यानंतर त्यांनी जाळपोळ सुरू केली. या जाळपोळमध्ये पोलिसांचाही सहभाग असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमधून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुरू असताना त्यांच्यासोबत 10 पोलीस चालत होते, असे नऊ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओची चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जमाव वाहने पेटवून देत असताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिले आहे.
हे देखील वाचा
तसेच दंगल घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. यात सहभागी २५०० हून अधिक अज्ञात लोकांवर दंगल भडकावणे, बेकायदा शस्त्र बाळगणे तसेच मारहाण व खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ओळख पटलेल्या ४० जणांवर थेट दंगलीचे गुन्हे दाखल केले असून २५ जणांना रविवारी अटकही करण्यात आली. या घटनेमुळे यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर २५० हून अधिक लोक यामध्ये जखमी झाले होते. काही संशयित जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच पोलिसांनी जाळपोळ झालेल्या भागांमध्ये पंचनामे करून नुकसानीची माहिती घेतली.