विंडीज संघासमोर २८९ धावांचे आव्हान
नाथन कूल्टर नाइल शतक हुकले
नॉटींघम: यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील १० व्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि अत्यंत बेभरवशी संघ म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडीज संघात गुरुवारी सामना झाला. ब्रीज मैदानावर हा सामना झाला. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या तगड्या ऑस्ट्रेलियाची विंडीजच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. डेव्हीड वॉर्नर, अरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा आणि ग्लेन मॅक्सवेल या दिग्गज फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूचा रस्ता दाखवत विंडीजच्या गोलंदाजांनी अक्षरशः ऑस्ट्रेलियन संघाला जेरीस आणले. ऑस्ट्रेलियन संघ २५० धावाही करणार की नाही अशी अवस्था होती, मात्र नाथन कूल्टर नाइल आणि स्टीव्हन स्मिथ यांनी दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला सावरले. अतिशय खराब स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने नाइल आणि स्मिथच्या फलंदाजीच्या जोरावर पूर्ण बाद २८८ धावा करत विंडीज संघासमोर २८९ धावांचे आव्हान ठेवले.
नाथन कूल्टर नाइलने ६० चेंडूत ९२ धावांची दमदार खेळी साकारली. त्याला स्टीव्हन स्मिथची ७३ धावांची चांगली साथ लाभली. नाइल ९२ धावांवर बाद झाल्याने त्याचा शतक थोडक्यात हुकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार जेसन होल्डरचा हा निर्णय शेल्डन कॉट्रेल, ऑशाने थॉमस आणि आंद्रे रसेल या त्रिमूर्तीनी सार्थकी ठरवला. थॉमसने फिन्चला, कॉट्रेलने डेव्हीड वॉर्नर आणि मॅक्सवेलला तर उस्मान ख्वाजाला आंद्रे रसेलने बाद करून ऑस्ट्रेलियन संघाचे कंबरडे मोडले. त्यामुळे ७.४ षटकांत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३८ अशी अवस्था होती. वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यातही वेस्ट इंडीज संघाने पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणले होते. स्टीव्हन स्मिथ आणि नाथन कूल्टर नाइल यांनी दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला सावरले.
असे होते दोन्ही संघ
वेस्ट इंडीज संघ: जेसन होल्डर (कर्णधार), ओशाने थॉमस, शेल्डन कॉटरेल, आंद्रे रसे, कार्लोस ब्रेथवेट, अॅश्ले नर्स, ख्रिस गेल, इवीन लेवीस, शाई होप, निकोलस पुरण, सिमरन हेटमायर, ओशाने थॉमस,
ऑस्ट्रेलियन संघ: अॅरॉन फिन्च (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, अॅलेक्स कॅरी, नाथन कूल्टर नाइल, पॅट कुमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा