मेलबर्न : आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत फेडररने विजयी सुरुवात केली. स्पेनचा दिग्गज राफेल नदाल यानेही सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना सहज आगेकूच केली असून, ब्रिटनचा स्टार अँडी मरे याला मात्र पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. या पराभवासह मरेने टेनिसमधून निवृत्तीही स्वीकारली.
सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना, डेनिसचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ६-४ असा पराभव केला. फेडररच्या मोठ्या अनुभवापुढे डेनिसला टेनिसचे धडेच मिळाले. फेडररने फोरहँडसह आपल्या विशेष बॅकहँड फटक्यांच्या जोरावर डेनिसला पुनरागमनाची संधीच दिली नाही. दुसरीकडे, गेल्या मोसमात पायाच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धांतून माघार घेतलेल्या नदालनेही आश्वासक सुरुवात करताना विजयी सलामी दिली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ७-५ असा पराभव केला.
त्याच वेळी अन्य लढतीत अँडी मरेचा पराभव टेनिस चाहत्यांसाठी जितका धक्कादायक होता, तितकाच तो भावनिकही ठरला. दुखापतींना सामोरे जात असलेल्या मरेने या आधीच यंदाची ऑस्ट्रेलियन स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल, असे घोषित केले होते. या वेळी पहिल्याच फेरीत २२व्या मानांकित रॉबर्टो बटिस्ता अगुट याने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना मरेचे कडवे आव्हान ६-४, ६-४, ६-७ (५), ६-७(४), ६-२ असे संपुष्टात आणले. या पराभवासह मरेने स्पर्धात्मक टेनिस विश्वाला गुडबायही केले.