मुंबई- १३ जणांना ठार केलेल्या ‘अवनी'(टी-१) या वाघिणीला ठार मारण्यात आल्याने सरकारवर चहूबाजूने टीका होत आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि प्राणीप्रेमी याबाबत सरकारवर टीका करीत आहे. दरम्यान ‘अवनी’ ला आम्हाला ठार मारायचे नव्हते. पण जेव्हा वन खात्याच्या अधिकाऱ्याने तिच्यावर ट्रँक्विलाइज़र डार्टने निशाणा साधला. त्यावेळी ती उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनाकडे झेपावली. त्यावेळी मी स्वसंरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली, असे शिकारी शआफतअली खान यांचा मुलगा नवाब अजगरअलीने स्पष्टीकरण दिले आहे.
अवनी वाघिणीला गोळ्या झाडून ठार मारल्यानंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत शआफतअली खान आणि त्याचा नवाब अजगरअली वादाचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर प्रथमच या पिता-पुत्रांनी आपली बाजू मांडली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी महाराष्ट्र सरकार तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. तसेच शआफतअली खानवर त्यांनी गंभीर आरोपही केले होते.
नवाब अजगरअली म्हणाला, मागील २ वर्षांत अवनीला ५ वेळा ट्रँक्विलाइज़ करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ग्रामस्थांना ती दिसली. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. वनअधिकाऱ्यांनी तिच्या दिशेने ट्रँक्विलाइज डार्टने निशाणा साधला. परंतु, यामुळे ती आणखीनच उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनावर ती झेपावली. मी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली.