आव्हाणीच्या राखीव गटातील तीन हजार ब्रास वाळू गायब

0

तापीच्या अधिकार्‍यांभोवती संशयाचे वावटळ

जळगाव – जिल्ह्यातील महत्वाकांक्षी असलेल्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी राखीव असलेल्या आव्हाणी येथील गटातुन उचल झालेली तीन हजार ब्रास वाळू गायब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे या गटातुन उर्वरीत वाळू तात्काळ उचल करावी असे पत्र जिल्हा प्रशासनाकडून तापी महामंडळाला देण्यात आले आहे. दरम्यान या सर्व प्रकारात तापी महामंडळाच्या अधिकार्‍यांभोवती संशयाचे वावटळ उठले आहे.
जिल्ह्यातील शासकीय योजनांच्या कामासाठी प्रशासनातर्फे काही वाळू गट राखीव ठेवण्यात आले होते. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा १ मधील जुनोने धरणाच्या कामासाठी जळगाव तालुक्यातील सावखेडा, धरणगाव तालुक्यातील आव्हानी भुसात्त तालुक्यातील भानखेडे, जोगलखेडे, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, पातोंडी येथील गट राखीव म्हणून मंजूर करण्यात आले होते. यातील आव्हाणी वाळू गटाची किंमत ३ कोटी ५० लाख ९२ हजार ५८ रूपयांचा भरणा तापी खोरे सर्वेक्षण विभागातर्फे प्रशासनाच्या गौणखनिज विभागाकडे भरणा करण्यात आला होता. या गटात ७ हजार ९८६ ब्रास वाळूसाठा मंजूर करण्यात आला होता. चक्रधर कन्स्ट्रक्शनला या गटातून वाळू वाहतुकीचे काम देण्यात आले होते. आत्तापर्यंत तीन हजार ब्रास वाळूची उचल या गटातुन झाली आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाळू गायब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. उचल झालेली वाळू नेमकी गेली कुठे? असा प्रश्‍न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान या सर्व प्रकारात संशयाची सुई ही तापी पाटबंधारेच्या अधिकार्‍यांभोवती फिरत आहे. जिल्हा प्रशासनाने उर्वरीत वाळू साठा तात्काळ उचल न केल्यास भरलेली रक्कम जमा केली जाईल असे पत्र आता तापी पाटबंधारे विभागाला दिले आहे. उर्वरीत वाळू देखिल गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.