खनिकर्म विभागाच्या बैठकीत निर्णय
जळगाव- अवैधरीत्या वाळू नेणारे डंपर, ट्रॅक्टर गेल्या अनेक महिन्यांपासून महसूल विभागाने जप्त केलेले आहेत. जिल्ह्यात अशी सुमारे १५० वाहने आहेत. या वाहनांचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने आज घेतला आहे. जून महिन्यात निविदा काढून लागलीच लिलाव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या वाहनधारकांवर गेल्या सहा ते सात महिन्यात कारवाई करण्यात आली. ज्यांनी नवीन वाळू धोरणानुसार दंड भरला नाही अशी वाहने संबंधित तालुका प्रशासनाने वाहने जप्त करून आपापल्या इमारतीत जमा केली आहे. अनेक महिने झाले तरी डंपर, ट्रॅक्टर चालक दंडाची रक्कम भरण्यास तयार नाहीत. यामुळे जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावून त्यांच्याकडून जप्त केलेल्या वाहन संख्येचा आढावा घेतला. दंड किती अपेक्षित आहे याचेही गणित मांडण्यात आले. अनेक दिवस झाल्यानंतरही संबंधित डंपर, ट्रॅक्टर चालक दंड भरून वाहन नेण्यास येत नाहीत अशी स्थिती आहे. यामुळे वाहने लिलावातून विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या सूचनांनुसार हा लिलाव होणार आहे. बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. लिलावात डंपरचा दर तीन लाख तर ट्रॅक्टरचा दर दीड लाख रुपये ठरविण्यात आला आहे.