नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आणखी पुढे ढकलली आहे. याप्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १० जानेवारी रोजी नव्या पीठाचे गठन होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होते, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाचे गठन करणे आवश्यक आहे, यामुळेच या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या १ मिनिटात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ३० सप्टेंबर २०१० मध्ये २.७७ एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात १४ पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.