नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा अयोध्या राम जन्मभूमी जमिनीच्या वादावर सुनावणीला सुरूवात होत आहे. सध्या सर्वोच्च न्यायालय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निर्णयाविरोधातील १३ याचिकांवर सुनावणी करत आहे. अलाहाबाद न्यायालयाने अयोध्येतील विवादित जमिनीचे तीन भागात विभाजन करण्याचा निर्णय दिला होता.
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने एकूण ३२ हस्तक्षेप याचिका फेटाळल्या आहेत. यात श्याम बेनेगल, अपर्ना सेन आणि तिस्ता सेटलवाड यांच्या याचिकांचाही समावेश आहे. गेल्या सुनावणी वेळी, भारताचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यामूर्ती अशोक भूषण आणि अब्दूल नजीर यांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणी कोणत्याही हस्तक्षेप याचिकेचा विचार केला जाणार नाही, असे म्हटले होते.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणातील भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची हस्तक्षेप याचिकाही फेटाळली होती. अयोध्येत १५२८ मध्ये मुघल सम्राट बाबर याने बाबरी मशीद बांधली होती. त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ मध्ये कारसेवकांनी ही मशीद तेथे असलेले राम मंदीर पाडून बांधण्यात आली, असा दावा करत पाडली होती.