अलीगड – अलीगड मुस्लीम विद्यापीठात जिना वाद पेटत चालला आहे. त्यातच आता विद्यार्थ्यांकडून ‘आजादी-आजादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे राजकारण अधिकच तापले आहे. या व्हिडिओमध्ये शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाबे सैय्यद गेटवर एकत्रित येऊन अशा प्रकारच्या घोषणा देताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओत आजादी, आजादी अशा घोषणा देताना दिसणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये जेएनयूच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने ‘हम लेकर रहेंगे आजादी, चाहे डंडा मारो, लेकिन दे दो आजादी’ अशा प्रकारच्या अनेक घोषणा देताना दिसत आहेत. या संपूर्ण विषयावर भाजप प्रदेशाध्यक्ष महेन्द्र पांडे यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलणे टाळले. एएमयूतील विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातून मोहम्मद अली जिनांचा फोटो काढण्यावरून दोन विद्यार्थ्यांच्या गटात वाद वाढतच आहे. आता या वादाला राजकीय वळण मिळाले आहे.