नवी दिल्ली- अभिनेता आयुष्यमान खुराणा याचा अलीकडे रिलीज झालेला ‘बधाई हो’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कॉमेडी असा हा चित्रपट आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ७ कोटी ३५ लाखांची कमाई करत बॉक्सऑफिसवर जोरदार धडक दिली. या चित्रपटाची १०० कोटींकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान ‘बधाई हो’ची कथा चोरीची असल्याचा आरोप करत पत्रकार, लेखकाने गुन्हा दाखल केला आहे.
छत्तीसगडचे लेखक व पत्रकार परितोष चक्रवर्ती यांनी ‘बधाई हो’चे निर्माता, दिग्दर्शक व लेखकावर कथा चोरल्याचा आरोप केला आहे.
19 वर्षांपूर्वी आलेल्या ‘घर बुनते हुए’ या आपल्या पुस्तकातील ‘जड’ नामक कथा चोरून हा चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोप परितोष यांनी केला आहे. सन 1998 मध्ये ‘जड’ नामक कथेचा आनंद बाजार पत्रिका ग्रुपशी संबंधित सुनंदा आणि कादम्बिनी या हिंदी साप्ताहिकाने बांगला भाषेत अनुवाद केला होता. ‘बधाई हो’ची कथा माझ्या याच कथेची हुबेहुब नक्कल करून बनवली आहे, असा दावाही परितोष यांनी केला आहे. या चित्रपटात आयुष्यमान खुराणाशिवाय नीना गुप्ता,सान्या मल्होत्रा आदी प्रमुख भूमिकेत आहेत़ अमित शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.