बजरंग पुनियाकडून रौप्य पदकाची कमाई

0

बुडापेस्ट : भारताचा मल्ल बजरंग पूनियाने जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रौप्य पदक पटकावले. ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या १९ वर्षीय ताकुटो ओटुगुरो याने बजरंगचे तगडे आव्हान १६-९ अशा फरकाने सुवर्ण पदक मिळविले. मात्र या पराभवानंतरही बजरंगची कामगिरी ऐतिहासिक ठरली असून या स्पर्धेत दोन पदक जिंकणारा पहिला भारतीय मल्ल असा पराक्रम त्याने केला आहे. याआधी २०१३ साली फ्रीस्टाइल ६० किलो वजनीगटात बजरंगने कांस्य मिळवले होते. दुसरीकडे ताकुटोनेही विक्रमी कामगिरी केली असून तो जपानचा सर्वात युवा जागतिक विजेता ठरला.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून आतापर्यंत केवळ सुशील कुमार यानेच सुवर्णपदक जिंकले आहे. दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलने २०१० साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. त्याचवेळी, यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बजरंगकडून यावर्षी जागतिक सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. यंदाच्या वर्षी बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.