नवी दिल्ली: पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळ इंडियन एअर फोर्सने उध्वस्त केले होते. यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला ‘ऑपरेशन बंदर’ हे कोडनाव देण्यात आले होते. २६ फेब्रुवारीला इंडियन एअर फोर्सने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवादी तळावर बॉम्बफेक केली. एअर फोर्सने दुसऱ्या देशाच्या हवाई हद्दीत जाऊन अशा प्रकारची कारवाई करण्याची दुर्मिळ बाब होती. एअर स्ट्राइकच्या मिशनला ‘ऑपरेशन बंदर’ हे कोडनेम देण्यात आले होते.
खैबर-पख्तूनखवा प्रांतातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हा एअर स्ट्राइक करण्यात आला होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे भारताने अधिकृतरित्या म्हटलेले नाही. पण या एअर स्ट्राइककडे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाहिले जाते. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यातील एका बसला स्फोटकाने भरलेले वाहन धडकवण्यात आले होते. यामध्ये भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते.
पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवडयांनी एअर फोर्सच्या मिराज २००० विमानांनी २६ फेब्रुवारीची पहाट उजाडण्याआधी वेगवेगळया हवाई तळांवरुन उड्डाण केले व अर्ध्या तासांच्या आता पाकिस्तानात घुसून जैशचा तळ उद्धवस्त केला. त्यावेळी ढगाळ हवामानामुळे एअर फोर्सला क्रिस्टल मेझ मिसाइलचा वापर करता आला नव्हता. अन्यथा या हल्ल्याचे लाईव्ह फुटेज मिळू शकले असते.
या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. पण सर्तक असलेल्या एअर फोर्सने त्यांचा हल्ल्याचा डाव उधळून लावला. यावेळी अभिनंदन वर्थमान यांच्या मिग-२१ बायसनने पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडले. वर्थमान यांचे मिग-२१ ही पीओकेमध्ये कोसळले. वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. पण भारताच्या दबावामुळे लगेचच पाकिस्तानला त्यांना सोडावे लागले.