नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी भारतीय एअर फोर्सच्या फायटर विमानांनी उध्वस्त केलेल्या पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आज सोमवारी 23 रोजी दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते.
आता पाकिस्तानने पुन्हा त्या ठिकाणी लोकांची जमवाजमव सुरु केली आहे असे जनरल रावत म्हणाले. भारतात घुसखोरी करण्यासाठी या तळावर 129 दहशतवादी सज्ज आहेत असे माध्यमातून सांगण्यात येत आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सच्या मिराज-2000 फायटर विमानांनी बालकोटच्या तळावर इस्रायली बनावटीच्या स्पाइस बॉम्बने हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झाले नाही हे पाकिस्तानने दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे प्रसारमाध्यमांना ते दोन महिन्यांनंतर घेऊन गेले. पुढच्या काही दिवसात पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण करणार आहेत. त्यापूर्वी ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्दावरुन भारताला घेरण्याची तयारी केली आहे.