राष्ट्रवादीचे पं.स. सदस्य ललित वाघ यांच्या घरातुन ३२ तोळे सोने, रोख रक्कमेची लूट
पाचोरा ( प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य ललित राजेंद्र वाघ यांच्या राहत्या घरी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे.या चोरीत घरातील सुमारे ३२ तोळे सोने व काही रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले आहेत.यावेळी घरात ललित वाघ यांच्या आई व पत्नी या दोघीच हजर होत्या तर स्वतः ललित वाघ हे शेतात गेले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की,दुचाकीवर आलेल्या दोघांनी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी कापडाने चेहरे बांधून घेतले होते.यावेळी वाघ यांच्या सात महिन्याच्या गर्भवती असलेल्या पत्नी धनश्री या घर पुसण्याचे काम करीत होत्या. तर आई या मागील असलेल्या घरात आराम करत होत्या.चोरट्यांनी वाघ यांच्या घरात प्रवेश करताच धनश्री यांच्या हाताला धारदार ब्लेडने जखमी केले व त्यांचे तोंड दाबून त्यांना धमकावले व कोणालाही फोन करू नकोस नाहीतर तुझ्या पतीला देखील आम्ही संपवून टाकू अशी धमकी दिली तर दुसर्या चोराने थेट घरातील कपाटाचे लॉकर तोडत रोख ऐशी हजार रकमेसह ३२ तोळे सोने सह एकूण आठ लाख बहात्तर हजार पाचशे रुपये चोरुन नेले.घटनेची माहिती धनश्री यांनी पती ललित वाघ यांना काळवताच ते घरी आले व त्यांनी झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ललित वाघ हे माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुतणे असून या घटनेनंतर पाचोर्यातील वाघ कुटुंबाय व आप्तेष्टांनी बाबरुड येथे धाव घेतली.
तपासासाठी तीन पथके
घटनास्थळी पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सह सहकारी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. नंतर पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तापसाबाबत सूचना दिल्या.चोरटे हे शेजारील सीसीटीव्हा कॅमेर्यात कैद झाले असून पोलिसांनी तपासास गती दिली आहे तर जळगाव येथून तपास कामी तीन वेगवेगळे पथक तयार केले आहेत. काही दिवसांपूर्वी कोणीतरी दोन अज्ञात तरुण ललित वाघ यांच्या घराशेजारून फेरफटका मारून गेले होते व त्यांनी शेजारून दुचाकी जाऊ शकेल का अशी विचारणा ललित वाघ यांच्या आईस देखील केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ग्रामीण भागात भरदिवसा अशा प्रकारे धाडसी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरांना तात्काळ जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचेसह पोलीस कर्मचारी तळ ठोकून असून लवकरच या चोरांना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे .रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविणाचे काम चालू होते. घटनेचा तपास पो. नि. अनिल शिंदे हे करीत आहेत.