ढाका-बांगलादेशमध्ये काल संसदेच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने मोठे यश मिळवले आहे. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर याची घोषणा करण्यात आली. शेख हसीना पुन्हा चौथ्यांदा पंतप्रधान होणार आहे. शेख हसीना पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले आहे. अवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमी सौहार्दाचे संबंध आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणत राजकीय हिंसा पहावयास मिळाली. यात देशभरात १७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षांनी मतदानात गडबड केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली आहे.
अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. तर त्यांच्या सहकारी पक्षाने २१ जागा मिळवल्या आहेत. तर विरोधी आघाडी नॅशनल यूनिटी फ्रंटला अवघ्या ७ जागांवरच विजय मिळाला आहे.
दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय नोंदवला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथे निवडणूक झाली नव्हती. हसीना यांना दक्षिण पश्चिम गोपालगंज मतदारसंघात २,२९,५३९ मते मिळाली. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बीएनपीच्या उमेदवाराला अवघे १२३ मते मिळाली, अशी माहिती बांगलादेश निवडणूक आयोगाने दिली.
बांगलादेशमधील विरोधी पक्ष एनयूएफ आघाडीने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. काळजीवाहू तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. एनयूएफ ही अनेक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये बीएनपी, गोनो फॉरम, जातीलय समाजतांत्रिक दल, नागोरिक ओयक्या आणि कृषक श्रमिक जनता लीगचा समावेश आहे.