मुंबई: शेतकऱ्यांप्रति असणारी भावना बँकांनी बदलणे गरजेचे आहे, व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिक कर्ज वाटप झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकी दरम्यान बोलत होते. राज्याच्या ४लाख, २४ हजार, २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दिलीप केसरकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित होते.
शेती घटक हा जर कमकुवत झाला तर त्याचा परिणाम जीडीपी वर होतो. म्हणून बँकांनी शेतकऱ्यांविषयी जाणीव ठेवत पतपुरवठा करावा असे फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या पिक कर्जाचे आकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ राज्यात ५४ टक्केच कर्ज वाटप झाले असून ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. उद्दिष्टपूर्तीसाठी जबाबदारी निश्चित करावी. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. बँकांनी कर्ज वाटपासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणे करून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत.
शाश्वत विकासासाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे, बँकांचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वाटप यात तफावत असता कामा नये. जास्तीत जास्त कर्ज वाटप झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाच्या विविध असलेल्या योजनांमधील पतपुरवठ्याची कामगिरीदेखील सुधारली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.