जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक

0

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवादी अब्दुल मजीद बाबा याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. अब्दुल मजीद बाबावर 2 लाखांचे बक्षिस होते. अब्दुल हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा येथील रहिवासी होता. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला अब्दुलविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

2007 मध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेव्हापासून अब्दुल मजीद बाबा हा फरार होता. पोलिसांनी या चकमकीनंतर तिघांना अटक केली होती. 2015 मध्ये उच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच फरार झालेल्या अब्दुल विरोधात उच्च न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले होते. दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. फैय्याज 2015 पासून फरार असून त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. तसेच त्याआधी काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर व पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार सज्जाद खानला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे.

दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मोहम्मद मीर यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली होती. किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली होती. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी असलेल्या आरएसएस नेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आरएसएस नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीएसओ जवान या गोळीबारात शहीद झाला आहे.