पुण्यात विश्वजित कदम यांच्याविरोधात फलकबाजी; पक्ष संपवण्याची शपथ पूर्ण झाली!
पुणे : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्यावर टीका करणारे फलक पुणे शहरात लागले आहेत. उपहासात्मक पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता नव्या फलकामुळे काँग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक या फलकाला देण्यात आले आहे. पक्ष संपविण्याची शपथ पूर्ण झाली असून, आता सांगलीला पर जा, अशी उपहासात्मक विनंती करण्यात आली आहे. या फलकबाजीमुळे पुण्यात चांगलीच चर्चा रंगली होती. फलकाच्या खाली काही व्यक्तींची नावे लिहिण्यात आली असून, असे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबद्दलही अशाचप्रकारचे फलक पुण्यात लावण्यात आले होते.
काय आहे फलकावरील मजकूर…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण पुणे दौर्यावर येणार असून, या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या फलकबाजीमुळे पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार असा मथळा असलेल्या या फलकांवरील मजकुरात म्हटले आहे की, बेटा तू वापस सांगलीला जा. निवडणुकीत पराभूत झाल्यावर तू पुण्यातील पक्ष संपविण्याची शपथ घेतली होतीस. ती पूर्ण केली. जा बाळा तुला कोणी थांबविणार नाही. आरे तू कष्ट करायचे व तुझ्या कष्टाचे पैस नेत्यांनी घ्यायचे. त्यांनी ते घरात ठेवायचे हे योग्य नाही. जा बंधू जा. गावाकडे जा. दु:ख एक आहे, पुणेकरांना तू खरेदी करू शकला नाहीस. तुझी महत्वकांक्षा पूर्ण झाली नाही. जा जा पुणेकरांना परत तोंड दाखवू नकोस. अशा या मजकुराच्याखाली राजू उर्फ भाऊ काळे, अमित कोकाटे, विश्वनाथ भोसले, परशुराम कोलते आणि मुबारक शेख यांची शुभेच्छुक म्हणून नावे आहेत.
काँग्रेसचा सातत्याने पराभव
मुळचे सांगलीचे असलेले व मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले विश्वजित कदम हे मोदी लाटेत पराभूत झाले होते. या मतदारसंघातून अनिल शिरोळे हे निवडून आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची पिछेहाट झाली. महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता.
सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी
विश्वजित कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असून, काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. तेव्हापासून विश्वजित कदम हे सार्वजनिक कार्यक्रम टाळताना दिसत आहेत. काँग्रेसने जीएसटीसंदर्भात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे व्याख्यान आयोजित केले होते. निमंत्रणपत्रिकेत कदम यांचे नाव होते. त्यावेळीही त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली होती.