नवी दिल्ली- दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये अरुण जेटली यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केले होते. या आरोपानंतर अरुण जेटली यांनी कुमार विश्वास यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. याबाबत कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान जेटली यांच्यावर आपण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केले होते असे स्पष्टीकरण कुमार विश्वास यांनी दिले आहे. न्यायालयात देखील आपण हेच सांगणार असल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले. न्यायालयात २८ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
कुमार विश्वास यांनी न्यायाधीश राजीव सहाय यांच्यासमोर बोलताना आपण केलेलं वक्तव्य पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे होत असं सांगितलं. हे प्रकरण पुढे जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, असं कुमार विश्वास यांनी न्यायालयात सांगितलं आहे. आपण फक्त अरविंद केजरीवाल जे बोलले त्याचाच पुर्नरुच्चार केला असल्याचं ते बोलले आहेत.
आपल्या वक्तव्यामुळे अरुण जेटली यांचं काही नुकसान झालं असेल तर माफी मागतो असं कुमार विश्वास यांनी न्यायाधीशांना सांगितलं. हा खटला मागे घेतला जावा यासाठी न्यायालयात काय जबाब द्यायचा यासाठी आपल्या वेळ हवा असल्याची मागणी कुमार विश्वास यांनी केली. महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहित आम आदमी पक्षाचे चार नेते राघव चढ्ढा, संजय सिंह, आशुतोष आणि दिपक वाजपेयी यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर अरुण जेटली यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला रद्द केला होता.
कुमार विश्वास यांनी मात्र खटला मागे घेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याने त्यांच्याविरोधातील प्रकरण न्यायालयाने कायम ठेवलं होतं. न्यायालयाने आज त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. अरुण जेटली यांनी डिसेंबर २०१५ मध्ये अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यावेळी केजरीवाल यांचे वकिल जेठमलानी यांनी उलटतपासणीदरम्यान आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्यांनी केजरीवालांविरोधात अजून एक १० कोटींचा खटला दाखल केला होता. डिसेंबर २०१५ मध्येही जेटलींनी डीडीसीएने वरुन केलेल्या आरोपांवरुन आम आदमीविरोधात अजून एक खटला दाखल केला होता.