मुंबई : २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर बीसीसीआय भारतीय संघात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाचे उपांत्य फेरीतच पॅकअप झाले. गेल्या काही सामन्यांत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टीकाकारांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०११ साली भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या धोनीला यंदा फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. संथ खेळामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही ( बीसीसीआय) धोनीच्या सेंड ऑफच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच या बाबतीत धोनी सोबत चर्चा करणार आहेत. तसेच आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून गांभीर्यानं सुरू आहे. २०२० साली होणाऱ्या ट्वेंटी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीत धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीकडून मिळाले आहेत.
संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा योग्य असल्याचे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यानी म्हटले. एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्माने त्याच्या खांद्यावर घ्यावी. सध्या यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. रोहितने नेतृत्व स्वीकारल्यास पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, अशा शब्दांत त्यांनी माहिती सांगितली. सध्या अनेक गोष्टींकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. या परिस्थितीसाठी रोहित शर्मा अतिशय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. संघात विराट आणि रोहित असे दोन गट असल्याच्या चर्चा अतिशय त्रासदायक आहेत, असेही ते पुढे म्हणाले.