नवी दिल्ली-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामुळेच देशात मोदी नावाच्या राक्षसाचा उदय झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही हातमिळवणी करणे शक्यच नाही. हा दावा करत काँग्रेस नेते अजय माकन यांनी आप या पक्षासोबत आघाडी करण्यासंबंधींच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Congress’ Ajay Maken denies report of talks between AAP-Congress alliance ahead of 2019 Lok Sabha polls. pic.twitter.com/5QyGocJ99c
— ANI (@ANI) June 2, 2018
राजकीय चर्चा रंगली
गेल्या महिन्याभरापासून काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय खलबते रंगल्याची चर्चा दिल्लीत चांगलीच रंगली होती. मात्र आम्ही आम आदमी पार्टीसोबत जाणे अशक्य आहे असे म्हणत अजय माकन यांनी या सगळ्या चर्चांना अर्थ नसल्याचे म्हटले आहे. जनतेला आप अर्थात आम आदमी पार्टीला नाकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही हातमिळवणी कशाला करू? अजय माकन यांनी ही भूमिका घेतलेली असतानाच दुसरीकडे आपचे नेते दिलीप पांडे यांनी आघाडीसाठी काँग्रेस इच्छुक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस काही वरिष्ठ नेते आपच्या संपर्कात आहेत. आम्हाला काँग्रेसची नाही तर काँग्रेसला आमची गरज असल्याचेही पांडे यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आप अर्थात आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मतांची टक्केवारी ५४ टक्के होती. आता हे प्रमाण कमी झाले असून ते २६ टक्क्यांवर आले आहे. तर काँग्रेसची मतांची टक्केवारी ९ टक्के इतकी कमी झाली होती जी आता २१ टक्क्यांपर्यंत आली आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे अशीही चर्चा आहे. असे असले तरीही या काँग्रेस आणि आप या दोन पक्षांमध्ये आघाडी होऊ शकणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.