सत्ताधारी नालेसफाईचे पैसे सोडत नसल्याने मुंबई पाण्यात

0

मुंबई: मुंबईत गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी होत असून चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. राज्यातील भाजप, सेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष नालेसफाईचे पैसेही सोडत नसल्याने मुंबई पाण्याखाली गेली आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबई मनपावर आव्हाडांनी कडक ताशेरे ओढले आहे. नालेसफाईचे काम हे मे महिन्यातच पूर्ण व्हायला पाहिजे पण हे काम जूनपर्यंत सुरु राहते तसेच काम अर्धवट सोडले जाते, असा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. हिंदमातासह अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले. याच सगळ्या मुद्द्यांवर बोट ठेवत जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेवर टीका केली आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचे असतील असा अंदाज व्यक्त केला आहे. ठाणे, पालघर, कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडत आहे. लोकल सेवेवर पावसाचा परिणाम झाल्याने आणि सखल भागांमध्ये पाणी साठल्याने मुंबईकराना त्रास सहन करावा लागतो आहे. मुंबईची कोंडी झाल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला आहे. आता जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांपैकी कुठला नेता उत्तर देतो? हे पाहणे महत्वाचे ठरेल.