खबरदार… वेगाने वाहने चालवाल तर.. हजाराचा दंड, 3 महिन्यांसाठी परवाना होणार रद्द

0

पाळधी महामार्ग विभागातर्फे वाहतूक नियम, कारवाईबाबत ट्रान्सपोर्ट नगरात जनजागृती

जळगाव– पोलीस विभागाने ठरवून दिलेल्या वेगमर्यापेक्षा वेगाने वाहन चालविणे युपढे दुचाकीस्वार तसेच ट्रक तसेच कारचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. दुचाकी तसेच कारसाठी 80 वेगमर्यादा असून ट्रकसह मालवाहू वाहनांसाठी 40 अशी वेगमर्यादा आहे. यापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍यांना एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना रद्द अशी कारवाई केली जाणार आहे. यासह इतर नियम तसेच कारवाईबाबत पाळधी महामार्ग पोलीस विभागातर्फे गुरुवारी ट्रान्सपोर्ट नगरात जनजागृती करण्यात आली.

राज्यभरात अपघातांची वाढती आकडेवारी ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाचे रस्ते सुरक्षा समितीचे त्याबाबत उपययोजना करण्याचे निर्देश शासनाला दिले आहे. त्यानुसर वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी अत्याधुनिक अशा इंटरसेफ्टर वाहन खरेदी करुन प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्रत्येकी दोन ते तीन याप्रमाणे व्हेईकल देण्यात आल्या आहेत. यात स्पीडगन, ब्रेथ अ‍ॅनॉलायझर, कॅमेरा, काळे काच तपासण्यासह अद्यावयात यंत्रणा कार्यरत आहेत. पाळधी महामार्ग पोलिसांकडून या अत्याधुनिक व्हेईकलव्दारे तपासणीसह कारवाई सुरुवात झाली आहे.

ट्रान्सपोर्ट नगर परिसरात जनजागृती

अत्याधुनिक इंटरसेफ्टर व्हेईलकलची माहिती वाहनचालकांना मिळावी यासह वाहतूक नियम, दंड व कारवाईबाबत पाळधी महामार्ग विभागातर्फे गुरुवारी ट्रान्सपोर्ट नगर भागात जनजागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज बडगुजर, घनशाम पवार, कपिल चौधरी, हेमंत माडीक हे उपस्थित होते. या पथकाने चालक तसेच मालकांची बैठक घेतली. तसेच सर्वांना वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच इंटरसेप्टर कार व त्याची कारवाई ,वेगमर्यादा, सुरक्षित प्रवास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच वाहतूक नियमांचे पत्रकही वाटप करण्यात आले.

वेग मर्यादेबाबत वाहनांवर अशी होईल कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांची वाहनांच्या वेग मर्यादेबाबत नुकतचे अधिसुचना जारी केले असून संबंधित विभागांना पाठविण्यात आली आहे. यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, महापालिका हद्दीतील रस्त्यांसह इतर मार्गावरील वाहनांचे वेग मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार वेग मर्यादा न पाळणार्‍या वाहनधारकांवर कारवाईला लवकरच सुरुवात होणार आहे. यात कार, तसेच दुचाकीला 80 वेग मर्यादेच बंधन आहे, तर ट्रकसह मालवाहू वाहनांना 40 वेग मर्यादेचे बंधन आहे. यात मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या चालकांना 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असून तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.