भंडारा-गोंदियासाठी भाजपकडून हेमंत पटले यांना उमेदवारी!

0

गोंदिया – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली गेली असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हेसुद्धा देखील संभाव्य उमेदवार असू शकतात.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन्ही पक्षातील पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर १० मे रोजी राष्ट्रवादीचा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता जलाराम मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे. दि.१० मे रोजी भाजप उमेदवारही नामांकन दाखल करणार असल्यामुळे गुरूवारला दोन्ही पक्षाचे शक्तीप्रदर्शन दिसून येणार आहे.